पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचं निधन झालं. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना रात्री साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके हे ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, पुत्र भगीरथ, तीन विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
भारत भालके यांना कोविड-१९ झाला होता. त्यातून ते बरेही झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आलं होतं. मात्र न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती ढासळत गेली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली होती. रात्री साडे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावातील शेतात आमदार भारत भालके यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्याहून सकाळी सात वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावाकडे पुण्याहून निघेल. सकाळी अकरापर्यंत गावी पोहोचेल. यानंतर चार वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवला जाईल. दुपारी चार वाजता याच ठिकाणी त्यांच्या शेतात भालके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालके यांची ओळख होती. डोक्यावर परिट घडीची पांढरी टोपी, पांढरा तीन गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख तसंच कायम दाढीत असणारे नाना यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार असा त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. २०१९ विधानसभा निवडणुकी आधी काँग्रेसचे आमदार होते. भाजपकडून तिकीट मिळवण्यास ते इच्छूक होते. परंतु भाजपने तिकीट दिलं नाही म्हणून राष्ट्रवादीकडे तिकीट मागितलं. काँग्रेसने जागा राष्ट्रवादीला सोडली आणि भारत भालके राष्ट्रवादीकडून आमदार झाले.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे. भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. २०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.