अहमदनगर (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘मी जबाबदार… माझा मास्क, माझी जबाबदारी’ अशा मथळ्याखाली एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यातून त्यांनी नागरिकांना करोनासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे सरकारमधीलच राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांनी थेट रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची कोणत्याही सुरक्षेविना भेट घेतली. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. यावरून त्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. तसंच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचंही आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात एक कॅम्पेन सुरू करण्यात आलं आहे. याद्वारे कायम हात स्वच्छ करत राहणं, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील सुपे येथील एका खासगी कोरोना रुग्णालयास आमदार लंके यांनी भेट दिली. अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लंके यांच्या पारनेर तालुक्यातही ती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लंके यांनी सुपे येथील खासगी रुग्णालयास भेट दिली. त्यावेळी तेथील डॉ. बाळासाहेब पठारे हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. कोरोनाची लक्षणे असलेल्या तसेच श्वसनाचा अधिक त्रास होत असलेल्या रुग्णांची लंके यांनी थेट त्यांच्या खाटांजवळ जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. काही ठिकाणी रुग्णांनी त्यांचे सेल्फी घेतले तर काही ठिकाणी स्वत: लंके यांनीही रुग्णांसोबत सेल्फी घेतले. लंके यांच्या या भेटीमुळे उपचार घेत असलेले रुग्ण सुखावल्याचे सांगण्यात आले.
गेल्या वेळीही कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी लंके यांनी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबविले होते. सर्वांत मोठे कोविड सेंटरही त्यांनी सुरू केले. रुग्णांना दिलासा दिला. आता पुन्हा त्यांनी हेच काम सुरू केले आहे, या गोष्टी खऱ्या असल्या तरी रुग्णांप्रती काळजी असल्याचे दाखविताना त्यांनी आपल्याच सरकारने घालून दिलेल्या नियमांचा मात्र भंग केल्याचे दिसते.