मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. तसेच जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने देखील पवारांसोबत उपस्थित आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला आहे. यात ६० पेक्षा जास्त वय असलेले आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या आजारी व्यक्तींना सामील करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लस घेतली आहे. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती कमी होणार?
जे.जे. रुग्णालय हे कोव्हॅक्सिन लसीकरणाचे मुंबईतील एकमेव केंद्र आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीच्या सुरक्षिततेतविषयी खात्री नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेत लस टोचून घेतली होती. मात्र, त्यानंतरही रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ठिकाणचे कर्मचारी कोव्हॅक्सिन लस घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे जे.जे. रुग्णालयातील कोरोना लसीकरण मोहीम संथ गतीने सुरु होती. मात्र, आता शरद पवार यांनी जे.जे. रुग्णालयात येऊन कोरोना लस घेतल्याचे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील लसीकरण मोहीम वेग पकडू शकते.
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.