जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार नूतन जिल्हाध्यक्षा वंदना अशोक चौधरी पाटील यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयात स्वीकारला.
जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त सक्षम महिलांना संधी देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा दौऱ्यात चाचपणी करण्यात येणार आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. या महामारीत अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्यावर अचानक कुटुंबाची मोठी जबाबदारी आली. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबाची वाताहात होत आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने या विधवा महिलांना तत्काळ मदत करावी. त्यांना रोजगार, स्वयंरोजगारासाठी प्राधान्याने विशेष योजना जाहीर करावी. त्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ व्हावी. त्यांना घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करात सवलत मिळावी. त्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा. त्यांना रेशनचे पिवळे कार्ड व इतर सवलती देण्यात याव्या, या विषयी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नशिल आहे, अशी ग्वाही वंदना चौधरी यांनी दिली.
पक्ष संघटनाच्या दृष्टीने लवकरच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर राहील. शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा, त्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचेही चौधरी यांनी नमूद केले.
यावेळी मंगला पाटील, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, संजय माळी, शकिला तडवी, कळमसरा येथील नूतन सरपंच व शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी आदी उपस्थित होते.