धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील नागरिकांना किमान मुलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. नागरिकांना येत असणाऱ्या समस्यांवर कोणतीही कार्यवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कमी न होता त्यात भर पडत असल्याचा आरोप करत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीने धरणगाव पालिकेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव शहराला २० ते २५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असून सदरचे पाणी हे अशुध्द असून पालिकेचे अधिकारी चुकीचा रिपोर्ट सादर करीत आहेत. नागरिकांना किडनी स्टोन आतड्यांचे आजार उदभवत आहेत. अधिकारी हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तरी याबाबत त्वरित कार्यवाही होऊन नागरिकांना शुध्द पाणी पुरविणे बाबत योग्य ती कार्यवाही व्हावी.
शहरातील कचरा साफ सफाईचे काम ज्या मक्तेदाराला दिले आहे, त्याचे सदर कचरा वाहून नेण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील वाटप केल्या जाणाऱ्या कचरा कुंडीचे वाटप न करता बिले काढण्यात आलेली आहे. शहरातील गटारींची नियमित साफसफाई होत नाही व फवारणी केली जात नाही.
धरणगाव शहरातील रस्त्यांची कामे हि निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. शहरातील हाय मास्ट पोल (पथदिवे ) यांची नियमित दुरुस्ती होत नाही. शहरातील नगर परिषदेचे शौचालय बांधकामाचे अंदाजपत्रक हे चुकीचे असून लगतच्या एरंडोल तालुक्यात सदर अंदाजपत्रक हे कमी किमतीचे आहे. शहरातील रस्त्यांची दुरावस्था असून धुळीचे साम्राज्य पसरलेले असून नागरिकांना त्यामुळे मणक्यांचे आजार,श्वसनाचे आजार होत आहेत. सर्व समस्यांवर तात्काळ उपाय कार्यवाही व्हावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा देखील राष्ट्रवादीने निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, धनराज माळी, मोहन पाटील, मनोज पाटील, हाजी इब्राहीम शेख, सीताराम मराठे, सागर वाजपेयी, अमोल हरपे, देवरे आबा, नारायण चौधरी, अशोक झुंजारराव, नगर मोमीन, सुरेश महाजन, रंगराव सावंत, आनंद पाटील, सुमित मराठे,गोविंदा पाटील, वैभव बोरसे, हरीश विसावे,छोटू महाजन यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.