जळगाव (प्रतिनिधी) वर्तमान परिस्थितीत सर्वात जास्त गरज असेल तर ती म्हणजे भगवान महावीरांचे विचार आणि सिद्धांत आज सर्वांनी आचरण्यात आणण्याची असल्याचे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलील मुथा यांनी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्ताने आयोजित सभेत केले. बालगंधर्व खुले नाटयगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
जैन दर्शनमधील सिद्धांत प्रत्येक प्राणीमात्रांना उपयुक्त असून आजही ते प्रासंगिक आहेत. समाजात आजही खूप समस्या आहेत त्या अनुषंगाने आपल्या सेवा समाजाला दिल्या पाहिजेत. पाणी, शिक्षण, विवाहाचे अवाढव्य खर्च सामान्य परिवारांना भेडसावत असतात. आम्ही मागील ४० वर्षांपासून समाजात
वावरत आहोत. समस्या समजून त्यावर उपाय योजत आहोत. आपण सर्वांनी मिळून जैन तत्वांच्या आधारे त्यावर मात केली पाहिजे आणि समाजाला मदतीचा हात दिला पाहिजे. जळगावशी माझे विशेष नाते आहे, भवरलाल जैन, सुरेशदादा जैन, ईश्वरबाबू जैन आणि रतनलालजी बाफना यांच्याशी माझे जवळचे नाते होते व आहे. वेळोवेळी सामाजिक कार्यात यांचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले आहे. जळगाव सर्व शहरांपेक्षा वेगळे असून येथील सकल जैन समाजाची एकता खूपच गौरवास्पद आहे. आम्ही तयार केलेला जीवनमूल्ये शिकवणारा एक नवीन अभ्यासक्रम (सिलॅबस-Syllabus) महाराष्ट्र शासनाने मंजूर केला असल्याचे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी घोषित केले.
जळगावच्या काँग्रेसभवनासमोरील जैन मंदिराजवळून सुरूवातीस जैन तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समिती २०२५ यांनी वरघोडा व विविध दृष्यांची झाकी, शोभायात्रा काढली. तसेच कलशधारी महिला व युवक युवतींनी या शोभायात्रेने लक्ष वेधून घेतले होते. ही मिरवणूक सराफ बाजाराकडून पुढे जात खुल्या बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत जवळजवळ नऊ वाजता पोहोचली. त्यानंतर तिथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या कार्यक्रमांना सूरूवात झाली. सर्वात प्रथम जैन धर्माच्या झेंड्याला ध्वजवंदन करण्यात आले. त्याच्या सन्मानार्थ एका गीताचे गायन झाले.
त्यानंतर आचार्य वैराग्यरत्न म. सा., १०८ श्री अनुत्तरसागरजी म. सा. व १०८ श्री सम्यकसागरजी म. सा. यांनी प्रारंभी उदबोधन करत मांगलिक मंत्र दिला. प्रास्ताविक तीर्थंकर प्रभू श्री महावीर स्वामी जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष राजकुमार सेठिया यांनी केले.
या समारंभात महाराष्ट्राचे माजी मंंत्री श्री सुरेशदादा जैन हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, जैन इरिगेशनचे चेअरमन श्री अशोक जैन, स्वर्ण उद्योजिका नयनतारा बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, गौतमप्रसादीचे प्रायोजक भवरलाल संघवी, कांतीलाल कोठारी, ललीत लोडाया, राजेश जैन, पवन सामसुखा मंचावर उपस्थित होते. ध्वजवंदन गीत, स्वागतगीत, नवकार गीत, विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी गायिले. संघवी परिवार व शांतीलाल मुथा यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन चोपडा तर आभार प्रदर्शन स्वरूप लुंकड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला समाजातील हजारो लोक सकाळपासून उपस्थित होते, हे विशेष. बाहेरगावाहून बोदवडचे अॅड. प्रकाश सुराणा, बडनेराचे सुदर्शन गांग, प्रशांतजी जैन आदि मान्यवर उपस्थित होते.