भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली आहे (Jawaharlal Nehru Statue vandalized). या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही हा व्हिडिओ (Shocking Video) ट्विटरवर शेअर केला आहे.
कमलनाथन यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहलं आहे की, “हा व्हिडिओ मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. यामध्ये काही समाजकंटक देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करताना दिसून येत आहेत. ही घटना अत्यंत निंदनीय आहे.” या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पुतळ्याच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार समोर येताच कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नेहरू यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी कॉंग्रेसने निषेध रॅली देखील काढली. पोलिसांनीही आता या घटनेची दखल घेतली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सहा जणांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.