भोपाळ (वृत्तसंस्था) महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली असं वक्तव्य मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी केले आहे.
काँग्रेस वाढते इंधनदर आणि इतर अनेक मुद्द्यांवरुन आंदोलन करत आहे. त्याविषयी सारंग यांनी म्हटले की, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचे श्रेय कोणाला द्यायचे असेल तर ते नेहरु कुटुंबाला द्यावे लागेल”. एक किंवा दोन दिवसात महागाई वाढत नाही. तसेच अर्थव्यवस्थेचा पायाही एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच अर्थव्यवस्था खालावली आहे,” असे सारंग यांनी म्हटले आहे.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खसे तर सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. नेहरुंनी त्याकडेच दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला. ” आपली ७० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून नेहरूंनी या क्षेत्राची चिंताच केली नाही. ग्रामीण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर आणि टिकणारी होती मात्र, नेहरूंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली,” असेही सारंगी म्हणाले. सध्याच्या स्थितीसाठी नेहरुंची चुकीची धोरणे जबाबदार आहेत, औद्योगीकरण ठीक होत, पण शेती त्याचा मूळ आधार असणे गरजेचे होते, असे सारंगी म्हणाले आहेत.