भुसावळ (प्रतिनिधी) विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
एकनाथ खडसे यांना ईडी ने ताब्यात घेतले, त्यांच्या जळगाव येथील घरावर, मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर जप्तीची नोटीस लावण्यात आली, अशा चर्चा बुधवारी दुपारपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात सुरू होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र या बाबतीत कोणत्याच पातळीवर दुजोरा मिळाला नव्हता. राजकीय पातळीवर सायंकाळपर्यंत जोरदार चर्चा सुरू झाली. खडसे यांच्या निकटवर्तीय यांनीही असा प्रकार झाला नसल्याचे सांगितले .परंतु एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र भ्रमणध्वनी लागत नव्हता. त्यामुळे चर्चेला अधिक उधाण आले होते.
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, विरोधकांकडून निव्वळ बदनामी करण्याचा प्रकार सुरू आहे. अफवा पसरवून बदनामी करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. कुठलेही चुकीचे काम केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काम नाही, न्याय व्यवस्थेवर आपला परीपूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
कुठलीही कारवाई नाही – ॲड. रोहिणी खडसे
अॅड. खडसे म्हणाल्या की, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे खाजगी कामानिमित्त दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत त्यामुळे केवळ काही लोकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम केले जात आहे. कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच जप्तीदेखील झालेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.