नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पीडित तरूणाने Google वर कॉल गर्ल सर्च केलं आणि त्यानंतर मिळालेल्या नंबर वर कॉल केला असता त्याच्या सोबत भयानक प्रकार घडला आहे. आरोपी तरुणीनं त्याला भेटायला बोलावून आपल्या मित्रांकडून बेदम मारहाण केली आहे. तसेच त्याच्याकडील 3 हजार रुपये रोख रक्कम आणि अकाउंटमधील ३० हजार रुपये ट्रान्सफर (money transfer) करून घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय पीडित तरुण नवी दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातील रहिवासी आहे. तो सॅनेटायझरशी संबंधित व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास त्याने गूगलवर कॉल गर्ल असं सर्च केलं होतं. यावेळी त्याला इंटरनेटवर एका मुलीचा नंबर मिळाला. काही वेळ फोनवर संवाद झाल्यानंतर संबंधित तरुणीने पीडित तरुणाला थेट व्हिडीओ कॉल केला आणि भेटायला बोलावलं.
संबंधित तरुणीने सर्वप्रथम त्याला रोहिणीतील सेक्टर २२ मध्ये बोलावलं. २ वाजता संबंधित तरुण त्याठिकाणी पोहोचला असता तरुणीने त्याला प्रेमनगर परिसरात बोलावलं. त्यानुसार, युवक तेथेही पोहोचला, पण युवतीने पुन्हा पीरबाबा येथील जागेवर बोलावलं. काही वेळात युवतीही तेथे आली. यानंतर युवतीने तरुणाला बाईकवर घेऊन ती पॉकेट-१३ येथे आली. याठिकाणी आरोपी तरुणी तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेली. दरम्यान आरोपी तरुणीने आपल्या काही साथीदारांना व्हिडीओ कॉलवरून सिग्नल दिला.
कॉल केल्यानंतर काही मिनिटातच त्याठिकाणी एक युवती आणि दोन युवक त्याठिकाणी आले. या सर्वांनी मिळून फिर्यादी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील ३ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी फिर्यादी तरुणाला त्याच्या अकाउंटवरील ३० हजार रुपये आरोपी तरुणीच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायला लावले. त्यानंतर धक्काबुक्की करत तरुणाला फ्लॅटमधून हाकलून दिलं. या प्रकारानंतर पीडित तरुणाने विहार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.