नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वाधिक उत्पन्न वाढ करण्याच्या बाबतीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकून अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी देशात नवे वेल्थ मॅग्नेट म्हणून समोर आले आहेत. एकूण संपत्तीबाबतीत अंबानी १० व्या तर अदानी ४० व्या स्थानी आहेत.
यंदा साडेदहा महिन्यांत अदानींची संपत्ती १.४१ लाख कोटींनी वाढली. म्हणजे त्यांनी संपत्तीत रोज ४४९ कोटींची भर टाकली. दुसरीकडे, मुकेश अंबानी आतापर्यंत आपल्या संपत्तीत १.२१ लाख कोटी रुपयांचीच (१६.४ अब्ज डॉलर) भर टाकू शकले. म्हणजेच अंबानींनी संपत्तीत रोज सुमारे ३८५ कोटींची भर घातली. ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या हिशेबाने संपत्तीत भर घालणाऱ्यांच्या यादीत अदानी जगात नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी जगातील दुसऱ्या (बिल गेट्स), ७ व्या (लॅरी पेज) व ९ व्या (स्टीव्ह बाल्मर) यांनाही मागे टाकले. सध्या अदानींची एकूण संपत्ती २.२५ लाख कोटी रु. (३०.४ अब्ज डॉलर) आहे. ते यादीत ४० व्या स्थानी आहेत. दुसरीकडे, १.२१ लाख कोटी रुपयांची भर पडल्यानंतर मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ५.५५ लाख कोटी रुपये (७५ अब्ज डॉलर) झाली आहे. यादीत ते जगातील १० वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या वर्षी जगात टेस्ला कंपनीच्या अॅलन मस्क यांनी संपत्तीत सर्वाधिक भर घातली आहे. त्यामुळे टस्क यांची संपत्ती ७.०३ लाख कोटी रु.नी (९५ अब्ज डॉलर) वाढून ती ९.१० लाख कोटी झाली आहे.