ठाणे (वृत्तसंस्था) विना मास्क फिरणाऱ्या व्यक्ती या स्वतः सोबत इतरांचा जीव देखील धोक्यात घालू शकतात म्हणून अश्या व्यक्तींवर महापालिका कारवाई करत आहे. मात्र या जबाबदारीचे भान नसलेल्या १९०० नागरिकांवर ठाणे महापालिकेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला आहे. या दंडाची एकूण रक्कम तब्बल साडे नऊ लाख रुपये आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी झाला असला तरी कोरोना संपलेला नाही. ती प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने मास्क लावून सार्वजनिक ठिकाणी फिरणे बंधनकारक आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक बनून मास्क घाला असे आवाहन करण्यातआहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच बाजारात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले होते. तसे अधिकार सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांना देखील आदेश देण्यात आले आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून या आदेशाची अंमबजावणी करताना तब्बल १९०० व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात आली आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. तर या व्यक्तींकडून ९ लाख ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये गेल्या २१ दिवसांत विना मास्क फिरणाऱ्या १९०० व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक विना मास्क व्यक्ती नौपाडा प्रभाग समिती आढळल्या असून, सर्वात कमी कारवाई वागळे प्रभाग समिती करण्यात आली असल्याचे महानगर पालिकेने सांगितले आहे.यापुढे देखील कारवाई सुरुच ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.