मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिवतीर्थावरील त्यांच्या स्मारकावर माथा टेकवून आदरांजली अर्पण केली.
आज शिवसेनाप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन. दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी राज्यभरातून लक्षावधी शिवसैनिक शिवतीर्थावर वंदन करण्यासाठी दाखल होत असतात. गेल्या वर्षी कोरोनानिमित्त याला मर्यादा आली होती. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्यामुळे आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणात जनसागतर शिवतीर्थावर असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पहाटे शिवतीर्थावर माथा टेकवून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. शिवसेनाप्रमुखांच्या जाज्वल्य विचारांना प्रमाण मानून आपण एक नेता, एक विचार आणि एक झेंडा हाती घेऊन आजवर वाटचाल केली असून भविष्यातही हा समाजकारणाचा वसा जोपासणार असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.