जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आज रावेरच्या शासकीय विश्रामगृहात साधारण अर्धा तास चर्चा झाली. परंतु या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया ‘द क्लियर न्यूज’कडे खडसे यांनी दिली आहे.
भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षांतराचा मुहूर्त हा घटस्थापनेचा होता. परंतु काही कारणांमुळे हा पक्षांतराचा विषय मागे पडला. तशातच बोरखेडा येथील घटनेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे नेमकं घटस्थापनेच्या दिवशी जळगाव जिल्ह्यात आले. पूर्वनियोजित भेट नसताही खडसे आणि देशमुख यांच्यामध्ये रावेरच्या शासकीय विश्रामगृहात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खडसे यांच्या पक्षांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा ऊत आला. परंतु याबाबत खुद्द खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, त्यांनी सांगितले की, आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीत आपण बोरखेडा येथील चार बालकांच्या पुण्याच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली असल्याचे सांगितले. दरम्यान राजकीय जाणकार मात्र, या भेटीत खडसेंच्या पक्षांतराचा संदर्भात निश्चितच चर्चा झाली असेल असे मत व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.