जळगाव (प्रतिनिधी) गरीब, गरजू, उपेक्षित घटकातील एकही होतकरू विद्यार्थी, विद्यार्थिनी पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यांना शिकवण्याची जवाबदारी मान्यवरांसह सर्व समाजाची आहे. त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी आपण नेहमी तयार आहे, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे नूतन चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली.
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रसंगी देवकर बोलत होते. हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात झाला. अध्यक्ष स्थानी आमदार चिमणराव पाटील होते. व्यासपीठावर पी. ई.पाटील, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातील शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, ग. स.बँकेचे माजी अध्यक्ष मनोजकुमार पाटील, काँग्रेसचे डी.जी.पाटील, प्रतिभा सुर्वे, दर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळ दर्जी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधीक्षक डॉ.संगीता गावित, प्रा. डॉ.डी. एम. ललवाणी, सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, सुमित पाटील, बाळू पाटील, श्री राजपूत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्लसिंग मोरे आदी उपस्थित होते. या वेळी एक गरजू विद्यार्थिनीला शिक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली.
गरजूंचे पालकत्व स्वीकारा
संकटातील विद्यार्थी, गराजुला शिक्षणासाठी योग्य ती मदत मिळालीच पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील सक्षम व्यक्तींनी स्वीकारावे. उपेक्षित घटकातील विद्यार्थांना आता मदतीचा हात मिळाल्यास ते भविष्यात इतरांचे आधारस्तंभ बनतील, असे मार्गदर्शन पी. ई.पाटील यांनी केले. बिकट परिस्थितीत शिक्षणासाठी मदत मिळाल्यास ते विद्यार्थी भविष्यात मोठे होऊन सर्वांसाठी प्रेरणास्थान बनतील. त्यांना शक्य ती मदत करण्यासाठी आपण तत्पर आहे, असे आश्वासन आमदार चिमणराव पाटील यांनी दिले. प्रशासन स्तरावर कोणास काही अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक प्राचार्य आर. व्हि.पाटील, प्रा. डॉ.डी. एम.ललवाणी यांनी केले.
यांचा झाला सन्मान
भुसावळ येथील रघुनाथ सोनवणे यांचे पर्यावरण, सामाजिक व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता त्यांना जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जितेंद्र पाटील, नितीन पाटील, के.सी.पाटील, अश्विनी निकम, कुणाल मोरे, दिलीप साळुंखे, चेतन निंबोळकर, भाग्यश्री तायडे, योगेश्वर नान वरे, निखिल ठक्कर, प्रेमलता पाटील, भारती पाथरवट आदींना समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आला. पर्यावरण विषयात योगदान देणारे शिक्षक किशोर पाटील, विजय लूल्हे, प्रवीण पाटील, मनीषा शिरसाठ, डॉ.विजय बागुल यांना पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राहुल सूर्यवंशी, सुनील बढे यांना आदर्श आरोग्य सेवक, तर डॉ.विलास नारखेडे यांना गिरिरत्न आणि डॉ.संगीता गावित व गायिका सुरेखा पोरवाल यांना नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर वाघ, सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले.