मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाविकांना कार्तिकी वारी गर्दी न करता साधेपणाने पार पाडण्याचं आवाहन केलं. तसेच कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे या त्रिसूत्रीचं पालन करावं, असंही आवाहन केलं.
यावेळी आपल्या संवादात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा आणि राज्य सरकारचे प्रयत्न याचीही माहिती दिली. ते आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. २४-२५ कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे. डोस दिल्यावर रुग्णाला कोणत्या तापमानात ठेवायचं हे सर्व अधांतरी आहे. त्यामुळे हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि मास्क लावा ही त्रिसूत्रीच पाळावी लागणार आहे.”
“मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.”