जळगाव (प्रतिनिधी) – अनुशोधन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) अंतर्गत ‘अ मल्टीयुनिर्व्हसिटी अलायन्स ऑन हेल्थ अँड एनर्जी थ्रू इंजिनिअर्ड बायोमोलक्युलर सिस्टीम्स’ या प्रकल्पासाठी २ कोटी ३० लाख रुपयांची मोठी अनुदान रक्कम मंजूर करण्यात आली आहे. हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथे प्रा. होथा श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली राबवला जाणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या प्रकल्पासाठी पात्र ठरले असून, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय राज्य विद्यापीठ रॅंकिंगमध्ये १०० च्या आत स्थान मिळवल्याने ही निवड शक्य झाली आहे.
PAIR योजना अंतर्गत एक वर्षासाठी मंजूर
सदर प्रकल्प अविष्कार व संशोधन गती वाढवण्यासाठी PAIR (Participating Across Institutional Research) योजनेअंतर्गत एका वर्षासाठी मंजूर झाला असून, अनुदानाची रक्कम ग्रांट-इन-एड जनरल (Recurring head) अंतर्गत वितरीत होणार आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात देशातील एकूण सहा विद्यापीठांचा सहभाग आहे :
1. इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अवंतीपोरा – डॉ. आबिद हुसेन शाल्ला
2. मणिपूर युनिव्हर्सिटी, इंफाळ – डॉ. राजू लैशराम
3. मोहनलाल सुखाडिया युनिव्हर्सिटी, उदयपूर – डॉ. सिद्धार्थ शर्मा
4. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – प्रा. दिपक शरद दलाल
5. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – प्रा. राजू गच्चे
6. काश्मीर युनिव्हर्सिटी, श्रीनगर – प्रा. अजीज ए. दार
संशोधन व शैक्षणिक देवाणघेवाणीस प्रोत्साहन
या प्रकल्पामुळे संशोधन पायाभूत सुविधांच्या विकासाला गती, विविध विद्यापीठांतील संयुक्त प्रकल्पांना चालना, तसेच शैक्षणिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने चार कार्यशाळांचे आयोजन होणार असून, काही प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांना IISER पुणे येथे प्रत्यक्ष संशोधनासाठी निधी मिळणार आहे.