नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील हदगाव येथील गोविंदराव पऊळ कॉलेजच्या मुलींच्या वसतीगृहामध्ये रॅगिंगचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी वसतीगृहात नवीन राहायला आल्याचं पाहून वसतीगृहातील काही सिनियर मुलींनी पीडितेचा छळ केला आहे. याप्रकरणी हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित रॅगिंगचा प्रकार नांदेड जिल्ह्याच्या हदगाव बामणी येथील गोविंदराव पऊळ नर्सिंग कॉलेजच्या वसतीगृहात घडला आहे. पीडित मुलीने आठ दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर ती महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहायला गेली होती. दरम्यान, मंगळवारी महाविद्यालयातील तीन वरिष्ठ मुली पीडितेच्या रुममध्ये गेल्या. ‘आम्ही तुझ्या सिनियर आहोत’ असं म्हणत दमदाटी करायला सुरुवात केली. तसेच पीडितेचा छळ करत तिला कपडे काढायला भाग पाडलं. तसेच नाक घासायला लावून रुमही झाडायला लावली. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पीडित मुलगी तक्रार करण्यासाठी शिक्षक भगीरथ शिंदे याच्याकडे गेली. संबंधित शिक्षकानं तिला मदत करण्याऐवजी पीडितेला वाईट हेतूने स्पर्श करायला सुरुवात केली. तसेच शिक्षकानं तिला धमकावल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. शिक्षकानंही आपली तक्रार ऐकून न घेतल्यानं पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना दिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित तरुणीचे वडील महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी मंगळवारी आपल्या मुलीला घेऊन हदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाविद्यालयातील तीन मुलींसह संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.