नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लडाखच्या सीमावादावरून चीनसोबत वारंवार चर्चा करून देखील त्यातून कोणताही पर्याय निघत नाही याबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. भारताचा स्वाभिमान दुखावणारी कोणतीही गोष्ट कदापि खपवून घेतली जाणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. पण कोणीही डिवचले तर आम्ही त्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला आहे.
पूर्व लडाखमधील सध्या सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा शेजारच्या देशाला इशारा दिला आहे. संरक्षणमंत्री म्हणाले की, वादविवादाच्या शांततेने तोडगा काढण्यावर भारताचा विश्वास आहे, परंतु देशाच्या स्वाभिमानाला कोणतीही इजा पोहोचवलेली सहन केली जाणार नाही. चीनच्या धोरणाला भारत चोख प्रत्युत्तर देईल. भारताचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा देखील राजनाथ सिंह यांनी दिला आहे. भारत आपल्या अभिमानाशी कोणतीही तडजोड करणार नाही तर भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं देखील राजनाथ सिंह यांनी चीनला इशारा दिला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ANI ला दिलेल्या वृत्तानुसार राजनाथ सिंह म्हणाले, ‘चीनने लडाखमध्ये सीमावादावरून जे केल त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हा नव्या जोमाचा भारत आहे. चीनच्या कुरघोडीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. संरक्षणमंत्री म्हणाले, चीनबरोबरच्या लडाख सीमेवरुन झालेल्या वादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघत नाही. LAC वर चीनसोबत वाटाघाटी सुरू आहेत मात्र चीन वारंवार करारांचं उल्लंघन करत आहे. भारत सीमारेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये सुरु असलेल्या चर्चेला अद्याप यश न आल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. लष्करी चर्चेची पुढची फेरी कधीही पार पडू शकते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्यास सीमेवरील परिस्थिती तशीच राहील. हे चांगले लक्षण नाही. सीमारेषेवर तणाव राहिल्यास दोन्ही बाजुंकडून मोठ्याप्रमाणावर तैनात करण्यात आलेले सैन्य मागे घेतले जाणार नाही. त्यामुळे आगामी चर्चेचे फलित हे सकारात्मक असावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले.
















