मुंबई (वृत्तसंस्था) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला जयभीम सिनेमा सुपरहिट ठरला, सोशल मिडियात त्याने अनेक दिवस चर्चा घडवून आणली. मात्र आता काही लोकांना त्यामध्ये वेगळे काही सापडायला लागले आहे. अभिनेता सूर्यासह जय भीम’ चित्रपटाचे निर्माते आणि ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडीओ कंपनीला ५ कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्यात आलीय. या प्रकरणी ‘वेन्नीयार संगम’ संघटनेचे राज्याध्यक्षांनी त्यांना नोटीस दिली आहे.
‘वेन्नीयार संगम’नुसार जय भीम चित्रपटात दाखवलेल्या काही दृष्यांमुळे वेन्नीयार समुदायाची बदनामी झाली आहे. प्रतिमाहनन करणारी ही दृष्यं चित्रपटात मुद्दाम टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच वेन्नीयार समुदायाविषयीचे दृष्य चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आलीय. त्यांच्यानुसार चित्रपटात दाखवलेला ‘अग्नी कुंदम’ हे प्रतिक वेन्नीयार समुहाची ओळख आहे. चित्रपटात कोठडीत निर्दोष व्यक्तीचा छळ करून त्याची हत्या करणाऱ्या आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचं नाव ‘गुरुमुर्ती’ असं ठेवण्यात आलंय. तसेच त्याचा उल्लेख गुरू असा करण्यात आलाय. गुरू हे वेन्नीयार समुदायातील एका मोठ्या नेत्याचं नाव आहे. याशिवाय पीडिताच्या मृत्यूची तारीख सिद्ध करताना या आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात दाखवलेल्या कॅलेंडरवर वेन्नीयार समुदायाचं प्रतिक दाखवण्यात आलंय, असा दावा नोटीसकर्त्यांनी केलाय.
या चित्रपटातील दृष्यांमुळे झालेल्या अब्रुनुकसानीसाठी नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसात ५ कोटी रुपये द्यावेत असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसेच या बदनामीसाठी निर्मात्यांनी जाहीर माफी मागावी. या माफीची छापील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात व्यापक प्रसिद्धी करावी, अशीही मागणी करण्यात आलीय.