मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉनमध्ये पेटलेला वाद चिघळला आहे. अॅमेझॉन कोर्टात गेल्यानंतर मुंबईतील दिंडोशी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे सचिवांना नोटीस पाठवली. या प्रकरणी ५ जानेवारील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मनसेनं अॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेलं.
तसेच याआधी देखील मनसे नेते अखिल चित्रे यांना सुद्धा १९ डिसेंबरला अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात आली होती. मनसेनेच्या कार्यकर्त्यांनी अॅमेझॉनने विविध ठिकाणी लावलेले पोस्टर फाडले होते. यामुळे अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने हा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषा असावी अशी मनसेचे मागणी आहे. मात्र मनसेची ही मागणी पूर्ण करण्यास अॅमेझॉनने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम सुरु करुन ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर असलेले फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावले. शिवाय याआधी अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही मनसेने पोस्टर झळकावले होते. त्यात भर म्हणून अॅमेझॉनने ठिकठिकाणी लावलेले पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी फाडले होते. याविरोधात अॅमेझॉनने कोर्टाचं दार ठोठावलं. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राज ठाकरे आणि सचिवांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय सुरु करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अॅमेझॉनकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असं असलं तरी मनसेची ही मोहीम सुरुच राहील. कारण ही मोहीम मराठी माणसांची, मराठी भाषेसाठी आहे. तसंच कोर्टानं जी नोटीस दिली आहे. त्यावरुन आता अॅमेझॉनला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिलाय.
















