मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यातील भेटीमुळे खळबळ उडालेली असताना, तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भेटीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले असताना आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्या भेटीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. देशमुख आणि वाझे हे चांदीवाल आयोगाच्या कार्यालयाबाहेर एकाच खोलीत सुमारे १० मिनिटे एकत्र होते, अशी नवी चर्चा आता सुरु झाली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. त्यावेळी चांदीवाल आयोगासमोर जाताना परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी दोघांमध्ये तब्बल एक तास संवाद झाला. एका खोलीत तब्बल एक तासासाठी त्यांचं बोलणं झालं. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणं झालं ते कळू शकलेलं नाही. दरम्यान परमबीर आणि सचिन वाझेंच्या भेटीवर अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. अशातच आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दाराआड १० मिनिटं चर्चा झाली.
परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी मुंबई पोलीस करणार आहे. मुंबई पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की, नाही? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. तसेच यासंदर्भात सचिन वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यासाठी घेऊन येणाऱ्या पथकाचीही चौकशी केली जाईल. दरम्यान, या तिघांमधील भेटीगाठीच्या सत्रामुळं सध्या राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी त्यांनी चर्चा केली का? किंवा केली असेल तर काय चर्चा केली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. मात्र, त्यांच्या एकत्र खोलीत असण्यावर जोरदार चर्चा सुरू झाल्या.















