जळगाव (प्रतिनिधी) दिल्ली पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत एका अज्ञात व्यक्तीने चाळीसगाव येथील ७३ वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव येथील फुले कॉलनीत राहणारे प्रकाश बाबुलाल शिंपी (वय ७३) हे वास्तव्यास असून ते सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहे. दि. १६ जून ते दि. २३ जून या कालावधीत सुनील कुमार नावाच्या एका व्यक्तीने शिंपी यांच्याशी दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल आणि चॅटद्वारे संपर्क साधला. या भामट्याने शिंपी यांना ‘तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात आहे,’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. सीबीआय आणि दिल्ली पोलीस बोलत असल्याचे भासवून त्याने शिंपी यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने एकूण ३१ लाख ५० हजार रुपये उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिली तक्रार
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, प्रकाश शिंपी यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत फिर्याद दिली. प्रकाश शिंपी यांच्या फिर्यादीनुसार, सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.