भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीच्या काठावरील स्मशानभूमीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी गेलेल्या नातेवाईकांना अस्थीच सापडल्या नाहीत. क्षणातच अस्थी चोरीचा संशय बळावला आणि स्मशानभूमीतील कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.
सर्वेश्वरनगर, मंगल शारदा कॉलनीलगत रिंगरोड परिसरातील या स्मशानभूमीत दि. २५ रोजी वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अस्थी न मिळाल्याने नातेवाईक थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आले. शेजारीच अंत्यसंस्कार झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मुलगा अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नसल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार नेमके कुठे झाले, याची त्याला कल्पनाच नव्हती. या गोंधळात त्याने चुकून वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणावरील अस्थी आपल्या वडिलांच्या समजून संकलित केल्या व तापी नदीत विसर्जन केले. त्यामुळे अस्थी चोरीचा संशय आणि नातेवाईकांचा मानसिक आघात यांचा भडका उडाला. घडलेली चूक लक्षात येताच संबंधित तरुणाने मृत महिलेच्या कुटुंबीयांची माफी मागितली.मात्र, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या ठिकाणी कोणतीही ओळखचिन्हे, क्रमांक व्यवस्था किंवा लेखी नोंद नसल्याने अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे स्मशानभूमीतील बेवारस, निष्काळजी आणि ढिसाळ व्यवस्थेचा भांडाफोड झाला असून, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक अंत्यसंस्कार स्थळाला क्रमांक देणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि अंत्यसंस्कारांची अधिकृत नोंद ठेवणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.















