धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एरंडोल रोडवरील हॉटेल मयूर गार्डनमध्ये अज्ञात चोरट्यांनी रोकडसह मद्याच्या बाटल्या चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल रोडवर गणेश उर्फ बापू चौधरी यांची हॉटेल मयूर गार्डन आहे. मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे स्टॉपसोबत जेवण करून रात्री दीड वाजेच्या सुमारास बापू चौधरी यांनी हॉटेल बंद केली. तर कर्मचारी वरील रूममध्ये झोपले. दरम्यान, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास श्री. चौधरी हे नेहमी प्रमाणे हॉटेलवर आल्यानंतर त्यांना मुख्य शटरचे कुलूप तोडलेले दिसले. आतप्रवेश केल्यानंतर बघितल्यावर सर्व सामान अस्तव्यस्त होता. चोरट्यांनी गल्ल्यातील १९ हजार ३७५ रुपयांची रोकड तसेच ६ बंपर आणि वेगवेगळ्या विदेशी मद्याच्या साधारण ४० बाटल्या असा एकूण ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बापू चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील चोरून नेला आहे.