अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथील पोलीस पाटील स्व.उल्हास लांडगे यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाखांची मदत मिळवून दिल्याबद्दल अमळनेर पोलीस पाटील संघटनेतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या सत्काराचा व आभाराचा कार्यक्रम मंगळग्रह मंदिरावर झाला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात नामदार पाटील यांनी तालुक्यातील पोलीस पाटलांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. पोलीस पाटील हा ब्रिटिशांच्या काळापासून शासनाचा व प्रशासनाचा महत्वाचा दुवा म्हणून काम करत आलेला आहे. संघटनेची मानधन वाढीची मागणी शासन दरबारी मांडून लवकरात लवकर त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार अनिल पाटील यांनी ग्रामीण भागात कोरोना आपत्तीत जीवाची पर्वा न करता प्रत्येक पोलीस पाटलाने गावाची सेवा केल्याचा उल्लेख केला. तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच आदेश काढले जातील असे त्यांनी सांगितले. ५० लाखांचा धनादेश स्व.उल्हास लांडगे यांच्या वारसांना सुपूर्द करण्यात आला.
संघटनेतर्फे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील व जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे यांनी संघटनेच्या मागण्या मनोगतातून पालकमंत्री व आमदार यांच्यासमोर मांडल्या. यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,स.पो.नि. राहुल फुला,पुरवठा अधिकारी संतोष बावणे, मंगळग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिंगम्बर महाले, खान्देश विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व्यासपीठावर उपस्थित होते.
मंगळग्रह मंदिराच्या विकास कामांसाठी देखील शासनाच्या माध्यमातून निधी वितरित केला जाईल याचा आवर्जून उल्लेख पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार अनिल पाटील यांनी केला. मेळाव्याला जिल्ह्याभरातून संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका अध्यक्ष भानुदास पाटील व स्थानिक पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन पत्रकार आर.जे.पाटील यांनी केले, आभार भाऊसाहेब पाटील पो.पा.शहापूर यांनी मानले.