जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळ सत्रात अनेक विद्यार्थ्यांना पोर्टलवर लॉगीन करता आले नाही. या तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या चांगलाच गोंधळ उडाला.
सोमवारी सकाळी १० वाजेपासून ऑनलाईन परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पोर्टलवर लॉगीन करता आले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले. ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येताच ऑनलाईन परीक्षेसाठी महाविद्यालयनिहाय नेमलेल्या आयटी सहायकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर काही वेळाने लॉगीनमध्ये येणारी अडचण दूर झाली. दरम्यान, या विषयासंदर्भात विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सकाळ सत्रात निश्चितच काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या पोर्टलवर लॉगीन करण्यात अडचणी आल्या. परंतु, त्यात बहुतांश विद्यार्थी हे मॉक टेस्ट न देणारे होते. त्यांना पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी काय माहिती भरायची? याची कल्पना नसल्याने ही अडचण आली. दरम्यान, ऑनलाईन व ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षांसाठी ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत या परीक्षा होत आहेत. ऑनलाईन परीक्षेसाठी ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २१ हजार ९३४, धुळे जिल्ह्यातील ११ हजार ५१३ व नंदूरबार जिल्ह्यातील ५ हजार ६४३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला असून यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७ हजार २९८, धुळे जिल्ह्यातील ३ हजार ९८६ व नंदूरबार जिल्ह्यातील ३ हजार १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी धुळे जिल्ह्यात ५३, जळगाव जिल्ह्यात ९४ व नंदूरबार जिल्ह्यात ३२ असे एकूण १७९ परीक्षा केंद्र आहेत.
No