पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार !
२५,५०० पुस्तके, इंटरनेटसह सुसज्ज संगणक लॅब असलेले ५ कोटी रुपयांचे जिल्हा ग्रंथालय भवन
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समितीच्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून जळगाव येथे भव्य जिल्हा ग्रंथालय समिती कार्यालय उभे राहिले आहे. या ग्रंथालयातील दोन सुसज्ज अभ्यासिकांमध्ये जळगाव शहरासह ग्रामीण भागातील तरुणाई स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून या ग्रंथालयाच्या सौर उर्जा प्रणालीसाठी अतिरिक्त ३१ लाख ५२ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
जळगाव मधील महाबळ परिसरात तब्बल २६.५ गुंठे जागेवर १६ हजार चौरस फुटांचे बांधकाम असलेले सुसज्ज असे जिल्हा ग्रंथालय भवन उभारण्यात आले आहे. या इमारतीत एक एसी व एक नॉन एसी अभ्यासिका, अंधांसाठी, महिला व बालकांसाठी स्वतंत्र विभाग आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासह येथे संगणक कक्ष देखील उभारण्यात आला असून त्यात १५ संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन आदि सुविधा इंटरनेटसह उपलब्ध आहेत. तज्ञांच्या व्याख्यानांसाठी प्रशस्त ऑडोटेरियम देखील आहे.
या ग्रंथालय भवनात २५ हजार ५०० पुस्तके व ग्रंथसंपदा आहे. यास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ विभाग देखील आहे. या अभ्यासिका विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करुन दिल्या जातात. येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करुन दरवर्षी ८ ते १० तरुण शासकीय सेवेत रुजू होत असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी दिली.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने ग्रंथांलय भवनात ३१ लक्ष ५२ हजार रुपयांची सोलर सिस्टिम उभारण्यात आली आहे. डीपीडीसी निधीतून बसविण्यात आलेल्या या सोलर सिस्टिममधून ५० केव्ही विजनिमिर्ती होते. यामुळे वर्षभरात ८ महिने येथे वीज बिल येत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात विजेची बचत होते. आता महाबळ रस्ता ते ग्रंथालयाच्या मुख्य इमारतीपर्यंत ३५ लक्ष रुपयांचे सिमेंट रस्ता काँक्रिटीकरण नियोजित आहे.
पालकमंत्र्यांमुळे तरुणाईला सर्व सुविधा एकाच छताखाली मोफत
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे ग्रंथालय भवनाकडे विशेष लक्ष असते. येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणाईला मोफत अभ्यासिका, मोफत पुस्तके, मोफत व्याख्यानमाला आदी सुविधा पुरविण्यात येतात. याचा लाभ जास्तीत जास्त तरुणाईला लाभ घ्यावा, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील दक्ष असतात. तरुण-तरुणींनी या मोफत अभ्यासिकेचा लाभ घेवून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन ना.पाटील यांनी केले आहे.