कोल्हापूर (वृत्तसंस्था) आईच्या मृत्यूची बातमी समजताच दुसऱ्या दिवशी मुलाने जीव सोडल्याची हृदयद्रावक घटना सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे घडली. येथील गोपाळ खंडू पाटील असे मृताचे नाव आहे. त्यांची आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीत पूजन करण्यासाठी गेल्या होत्या. तत्पूर्वी, आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
गोपाळ पाटील यांच्या आई बाबाई खंडू पाटील या कृष्णा नदीमध्ये मंगळवारी धार्मिक विधी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आंघोळ करताना त्या नदीत बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे गोपाळ पाटील यांच्यावर डेंग्यूसदृश आजाराने आजारी असल्याने सांगलीमध्ये उपचार सुरू होते.
उपचार सुरु असतानाच त्यांच्या कानावर आईच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे त्यांचेही निधन झाले. माय लेकरांचा मृत्यू अवघ्या काही तासांच्या अंतरावर झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोपाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.