साकोरा (वृत्तसंस्था) नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याला पॉलिश करून देण्याचा बहाणा करून महिलेच्या अंगावरील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत लंपास केली. याबाबत संबंधित कुटुंबाने नांदगाव पोलिसांत अज्ञात दोघांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे.
गुरूवारी (दि. १७) सकाळी दहा वाजेच्या साकोरा येथे सुमारास वेहळगांव रस्त्याशेजारील लता शरद बोरसे व मिराबाई उत्तम बोरसे या दोन महिलांना दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो म्हणून गंडा घातल्याचा प्रकार घडला. संशयितांनी सुरुवातीला तांब्या व वाटिला तसेच देवघरातील मढवलेले देव साफ करून विश्वास संपादन करून तीन वेळा पिण्याचे पाणी आणण्यास सांगितले. त्यानंतर हातातल्या सोन्याच्या बांगड्या उजळून देतो असे सांगीतले. मात्र महिलेच्या हातातून बांगड्याा निघत नसल्याने शेवटी गळ्यातील अडीच तोळ्यांची पोत पॉलिश करण्यास सांगितले.
पोत साफ करताना दुसऱ्या व्यक्तीने बॅगमधून पावडर काढून लता बोरसे यांच्या हातात देवून या पावडरने बाकी भांडे स्वच्छ करण्यासाठी दिली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत मोटोरसायकल सुरू करून दोघांनी अडिच तोळ्यांची पोत घेवून पोबारा केला. त्यानंतर बोरसे कटुंबियांनी नांदगाव पोलिसांत अज्ञात दोन चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.