नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी रुग्णसंख्या मात्र अद्यापही चिंताजनक आहे. देशात ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ५८५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४० हजार १२० नवे रुग्ण आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २१ लाख १७ हजार ८२६ इतकी झाली आहे. दरम्यान देशात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १३ लाख २ हजार ३४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ८५ हजार २२७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ३० हजार २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ५८५ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ४२ हजार २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दरम्यान देशात आतापर्यंत ५९ कोटी ९५ लाख ८२ हजार ९५६ लोकांचं लसीकरण झालं आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल (गुरुवार) ६,३८८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ हजार ३९० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६१ लाख ७५ हजार ०१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८टक्के आहे. राज्यात काल (गुरुवार) २०८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.११ टक्के झाला आहे. तब्बल ३२ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ६२ हजार ३५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.