नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित साप्ताहिक केंद्र नांदेड येथे 14 मे, रविवार रोजी ग्राम अभियांनांतर्गत भव्य-दिव्य एक दिवसीय उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. शिबिरात नांदेड गावातील 50 ते 60 विद्यार्थ्यांनी शिबिरात भाग घेऊन आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे नियोजन प्रमोद अत्तरदे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मायाताई बाविस्कर, धनश्री अत्तरदे, गायत्री अत्तरदे, नम्रता अत्तरदे या बालसंस्कार प्रतिनिधींनी सहभागी होऊन पूर्ण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धरणगाव तालुका बालसंस्कार केंद्राचे प्रतिनिधी प्रविण बडगुजर सर यांनी करत विविध उपक्रम मुलांना सांगून त्यांच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतले. तसेच पाच गुरूंचे महत्व सांगून आदर्श दिनचर्या काय असते?, आणि स्मरणशक्ती वाढवणारे, बुद्धीला चालना देणारे स्तोत्र मंत्र त्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री गणपती स्तोत्र श्री, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा गायत्री मंत्र, गणेश गायत्री मंत्र, सूर्य मंत्र यांची उपासना व सेवा यांचे महत्त्व सांगितले व त्यांच्याकडून सेवा करून घेण्यात आली. बडगुजर सर यांनी अनमोल मार्गदर्शन करून त्याचे महत्व मुलांना प्रत्यक्ष पटवून देत विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुमाऊलींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र बक्षीस मान्यवरांचा हस्ते देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गौरव करून त्यांना गावातील दानशूर व्यक्तीनी दिलेला कढी -खिचडीच्या महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रदीप महाजन यांनी फोटो, विडिओ शुटींग आणि सुव्यवस्था ठेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी नांदेड गावातील सर्व ग्रामवासी यांनी मोलाचे सहकार्य करून आपली स्वामी सेवा रुजू केली. कार्यक्रम फार सुंदर व आनंदात संपन्न झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.