पहुर (प्रतिनिधी) एकाला टॉयलेटमध्ये कोंडून अज्ञात दोन चोरट्यांनी सोन्याचे दागिन्यांसह रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पहूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सुकलाल पाटील (वय-३९ रा. होळकर नगर, पहूर पेठ जामनेर) यांचे कापड दुकान असून त्यावर उदरनिर्वाह करतात. ते भाड्याच्या घरात राहतात. गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री ते घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात खळखळचा आवाज आल्याने सुधीर पाटील यांना जाग आली. पाहतो तर त्यांच्या घरात अज्ञात चोरटे चोरी करण्यासाठी आल्याचे दिसून आले. चोरट्यांनी सुधिर पाटील यांना धमकी देवून टॉयलेटमध्ये कोंडून दिले. व घरातील लोखंडी कपाटातून ४८ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केला.
याबाबत सुधीर पाटील यांनी पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.
















