मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती दिवसागणिक भयानक होत आहे. त्यातच राज्यात सात ते आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचं आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुणाईला केले आहे.
आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील रक्तसाठ्याची सद्यस्थितीची माहिती दिली आहे. ‘ब्लड बँका रिकाम्या झाल्या आहेत. आपल्याकडं पुढचे सात-आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळं लोकांनी पुढं येऊन रक्तदान करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं तरुणांनी स्वेच्छेनं व नि:स्वार्थ भावनेनं पुढं यावं,’ असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे. ‘रक्तदान करा, जीव वाचवा’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रक्ताची मागणीही वाढली आहे. मात्र, संसर्गाच्या भीतीनं सध्या रक्तदानाचं प्रमाण कमी झालं आहे. मागील वर्षी अशी परिस्थिती उद्भवल्यामुळं अनेक शस्त्रक्रिया पुढं ढकलाव्या लागल्या होत्या. यंदा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कालच राज्यातील रक्तसाठ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. सध्या संपूर्ण लॉकडाऊन नसल्यामुळं लोकांनी आपापल्या परिसरात रक्तदान शिबिरं आयोजित करावीत, असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. तर काही शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आलेत. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा वेग थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात काल तब्बल ४३ हजार १८३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली असून लॉकडाऊनच्या छाया गडद होताना दिसत आहेत.