नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम आदमी पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे ‘आप’ला चिरडण्यासाठी त्यांनी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप कार्यालयावर धडकण्यापूर्वी लावला. केजरीवाल यांनी रविवारी आपचे खासदार, आमदार, मंत्री आणि शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपच्या मुख्यालयावर काढला होता.
आपच्या कार्यालयात दुपारी पोहोचल्यानंतर अन्य नेते व कार्यकर्त्यांसोबत अरविंद केजरीवाल यांनी भाजप मुख्यालयावर मोर्चा काढला. आपच्या प्रस्तावित आंदोलनामुळे भाजप मुख्यालय व परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मोर्चाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी अर्ध्या वाटेत आप नेत्यांना रोखले. परंतु कोणत्याही मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली नाही. ताब्यात घेण्यात आलेल्या काही आप कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी नंतर सोडून दिले. मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी केजरीवाल यांनी भाजपवर सडकून टीका केली.
भाजप आपला एक आव्हान म्हणून पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपच्या वाढत्या लोकप्रियतेने चिंतेत आहेत. आपला पक्ष वेगाने वाढत आहे. त्यामुळे मोदींनी आपल्या पक्षाला चिरडण्यासाठी ‘ऑपरेशन झाडू’ सुरू केले आहे. येत्या काळात पक्षाचे बँक खाते गोठवले जातील. आपले कार्यालय हिसकावून घेतले जातील आणि आपल्याला रस्त्यावर आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. येत्या काळ्यात आपल्यासमोर अनेक मोठी आव्हाने असतील. त्याचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे आवाहनही केजरीवाल यांनी आप नेते व कार्यकर्त्यांना केले. यापूर्वी भूतकाळात देखील आपण सर्वांनी अनेक आव्हानांचा सामना केल्याचे लक्षात ठेवा.
आपल्या सर्वांवर भगवान हनुमानाचा आशीर्वाद आहे. आपल्या सगळ्यांना सत्याच्या मार्गावर चालताना समाजासाठी काम करत राहायचे असल्याचे केजरीवाल म्हणाले. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामिनावर बाहेर असलेल्या केजरीवाल यांनी शनिवारी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. आपचे आमदार, खासदार, मंत्री यांपैकी वाटेल त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटक करावी. यासाठी मी माझ्या पक्षाच्या नेत्यांसह भाजप मुख्यालयावर जाणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते.
















