मुंबई (वृत्तसंस्था) सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदे यांनीही हसून दाद दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. 39 आमदारांना फोडून शिंदे यांनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठले होते. शिंदे गुवाहाटीला पोहोचले तेव्हा त्यांच्या गटात एक एक करून शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार गटात सामील झाले होते. या आमदारांना 50 कोटी रुपये देण्याची आल्याची चर्चा रंगली होती. हाच धागा पकडून विरोधकांनी अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी केली.
शंभू राजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र जमून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ’50 खोके…एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?’ असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.
विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीनंतर सभागृहामध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांनी राष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला. तर विरोधकांची स्थगन प्रस्ताव सादर करण्याची मागणी होती. पण, ती मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करून गोंधळ घातला.
हे गद्दार सरकार असून कोसळणारच : आदित्य ठाकरे
विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.
















