उस्मानाबाद (वृत्तसंस्था) सहा लाख कामांमध्ये ७०० तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात. जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते.
जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकी निर्णय घेण्यात आला होता. तसेच एसआयटीमार्फत ही चौकशी होणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यामुळे यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खुले आव्हान दिले आहे. फडणवीस पुढे म्हणाले की, ‘जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामें नाहीत. सहा लाख कामं त्याठिकाणी झाली आहेत. या सहा लाख कामांपैकी सर्व कामं ही विकेंद्री पद्धतीने झाली. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होते. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यासर्व विभागांनी कामं केली. साधारणपणे अॅव्हरेज एक लाखांपासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक लेव्हलवरच याचे टेंडर्स निघाले आहेत आणि ही कामं करण्यात आलेली आहेत. पुढे ते म्हणाले की, “”करोना संकट संपू द्या आम्ही प्रत्येत गावात, तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मतच नोंदवणार आहे. आमच्याकडे आधीपासून ते आहेदेखील. अनेक शेतकऱ्यांनी काय फायदा झाला हे सांगितलं आहे. जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच मांडणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे”.















