बोदवड (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदुस्तान स्काऊट व गाईड महाराष्ट्र राज्यशी संलग्नित एकाकाद्वारे मंगळवार दिनांक १४ रोजी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावर आधारित या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाच्या संरक्षण व कायदा यात स्काऊट व गाईड मधे मिळत असलेले शिक्षण याचे कसे महत्त्वाचे योगदान आहे हे सोदाहरण सांगितले. अधिकाधिक फलदायी उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विकासास चालना देण्याचे मानस त्यांनी व्यक्त केला.
दिवसभर चाललेल्या या शिबिराची सुरुवा योग शिक्षक शेखरसिंग चौहान यांच्या योग व प्राणायामाने झाली. विवीध योगासने व प्राणायाम त्यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतले व त्याचे महत्त्व देखील सांगितले. यानंतर डॉ. गीता पाटील यांनी आपत्तिव्यवस्थपणासाठी आवश्यक असणाऱ्या गाठीचे वेगवेगळे प्रकार व त्यांचे उपयोग याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. यानंतर ट्रेकिंग चे धडे गिरविले. यामध्ये दोरीच्या साहाय्याने इमारतीवर चाढणे, उतरणे व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याचा सराव केला. तसेच विद्यार्थ्यांनी रस्सीखेच व इतर खेळांचा मनमुराद आनंद लुटला.
भोजनसत्रा नंतर डॉ. व्ही. पी. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यात त्यांनी जखम, सूज, चक्कर येणे, अपघात, भाजणे इत्यादी विषयावर आपल्या स्तरावर कोणकोणते उपचार करावे याबद्दल सखोल माहीती दिली. तसेच सदैव आपल्या जवळ उपयोगात येणारी कोणकोणती साधने बाळगावी याबद्दल सांगितले.
शिबिराचा शेवट विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून करण्यात आला. प्रास्ताविक स्काऊट व गाईड चे प्रमुख नरेंद्र जोशी यांनी केले व सूत्रसंचालन साक्षी संजय पाटील हीने केले. आभार स्काऊट व गाईड च्या प्रमुख डॉ. गीता पाटील यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक प्रभाकर महाले, वैशाली संसारे,अनिल धनगर, डॉ. रत्ना जवरास, अजित पाटील,डॉ. अमर वाघमोडे,वैभव माटे,नामदेव बडगुजर यांचे सहकार्य लाभले.