लंडन (वृत्तसंस्था) सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे गेल्या महिन्यात लंडनला निघून गेले आहेत. यानंतर आता वडील सायरस पूनावालाही लंडनला गेले आहेत. आता वडिलांनीही आपल्या कुटुंबासमवेत लंडन गाठल्यामुळे पूनावाला परिवारानं देश का सोडला याचा तर्क वितर्क लावला जात आहे. पण सायरस पूनावाला यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे.
इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सायरस पूनावाला म्हणाले की, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी लंडनला येतो. त्यामुळे आता जी लोकं असं म्हणत आहेत की, मी आणि माझ्या मुलानं देश सोडला आहे. ते सर्व खोटं आणि मूर्खपणाचं आहे. ते पुढे म्हणाले की, ‘मी दरवर्षी मे महिन्यात लंडनला येत असतो. लहानपणापासून आदरही इथे येत असतो. त्यामुळे सध्याच्या स्थितीत मी आणि माझ्या कुटुंबीयांनी येथे येणं काही नवीन नाही.
सध्या सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे. यापूर्वी ३ मे रोजी आपल्या वक्तव्यात अदर पूनावाला यांनी एका रात्रीत लसीचं उत्पादन वाढवणं, त्यात तेजी आणणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. तसंच क्षमता वाढवण्यासाठी आपली कंपनी शक्य ते प्रयत्न करत आहे आणि ध्येय गाठण्यासाठी अधिकाधिक मेहनत केली जाईल असंही अदर पूनावाला म्हणाले होते.
आपला लंडनमधील मुक्काम हा तात्पुरता आणि लवकरच आपण भारतात परतण्याच्या विचारात असल्याचं पूनावाला यांनी १ मे रोजी ट्विटरद्वारे सांगितलं होतं. सध्या त्यांचे वडिलही लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाणं ही नियमित बाब आहे. “अदर पूनावाला जेव्हा लहान होते तेव्हापासून त्यांना घेऊन आपण लंडनला येत होतो. आता त्यांची मुलं लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. हा एक नियमित प्रवास आहे. खरं पाहिलं तर आम्ही दरवर्षी डर्बीत जातो,” असंही ते म्हणाले.
अदर पूनावाला गेल्या एक महिन्यापासून लंडनमध्ये वास्तव्याला असून ते युरोपमध्ये लस निर्मितीचे नवीन युनिट सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. याची पुष्टी पुन्हा एकदा सायरस पूनावाला यांनी केली आहे. यावेळी सायरस म्हणाले की, ‘सध्या पुण्यात लस तयार केली जात आहे. परंतु आम्ही युरोपमध्ये एक नवीन युनिट स्थापित करण्याच्या विचार करत आहोत. पण आत्ताच, याबद्दल कोणतीही माहिती देणं उतावीळ ठरू शकतं.