जळगाव (प्रतिनिधी) दि. १४ मे २०२१ रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद या पवित्र सणानिमित्त आवश्यक असलेली दुकाने सुरु ठेवण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, दि. १४ मे २०२१ रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद हे पवित्र सण असल्यामुळे नागरिकांना सणासाठी विविध वस्तू खरेदी करावयाच्या असतात. मात्र, सद्यस्थितीत फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरु आहेत. या संदर्भात भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष शफी पेहलवान व नगरसेवक मुन्ना तेली यांनी माझ्याकडे दिलेल्या निवेदनानुसार ईदनिमित्त कापड व सुकामेवा, पादत्राणेची दुकाने दि. १३ मे पासून दि. १४ मे २०२१ पर्यंत सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरु ठेवण्यात यावी. तसंच मुक्ताईनगर येथील उपनगराध्यक्षा मनीषा पाटील यांनी देखील अक्षयतृतीया निमित्त आवश्यक असलेली दुकाने सुरु ठेवण्यात यावी, असे निवेदनात दिले होते. त्यामुळे या दोन्ही सणांच्या दृष्टीने आवश्यक असलेली दुकानं सुरू ठेवावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे.
दरम्यान एकनाथराव खडसे यांच्यावतीने माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.