मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम म्हणजे ई दरोडा, दरवाजे तोडले नाही पण तिजोरी लुटली आहे. सायबर क्राईम डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजूरी देऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हटले की, या मुहूर्तावर राज्यघटनेचे, देशाच्या नागरिकांचे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीस सुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते. काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे. असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
दरम्यान, या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.