नाशिक (प्रतिनिधी) ऑनलाइन शिक्षण येत नसल्याच्या रागातून एका आईने आपल्या तीन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी फाटा परिसरातील साईसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ७ येथे उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि सुरेश पाठक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा परिसरातील साईसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ७ येथे शिखा सागर पाठक (वय ३०) या पती आणि तीन वर्षीय मुलगा रिधान सागर पाठक यांच्यासोबत राहतात. सोमवारी सायंकाळी फ्लॅटच्या बेडरूममध्ये मुलाला ऑनलाइन शिकवणी देत होते. बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. महिलेने सुरुवातीला मुलाचे तोंड उशीने दाबून त्याचा खून केला. नंतर काही वेळाने तिने बेडरूममध्ये गळफास घेतला. शवविच्छेदन अहवालात मुलाचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी (दि. १०) इंदिरानगर पोलिस ठाण्यात मयत महिलेच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेवर सुरू हाेते मानसाेपचार
मयत महिला मानसिक आजारावर उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन वर्षांच्या चिमुकल्याकडून ऑनलाइन शिक्षणाची तिने अपेक्षा ठेवली. मुलास काही येत नसल्याने या रागातून महिलेने हे पाऊल उचलले असल्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी दिली.