नागपूर (वृत्तसंस्था) नागपूर-वर्धा महामार्गावरील एका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला कुऱ्हाडीच्या धाक दाखवून झुडपात ओढत नेऊन एका गुराख्याने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान महाविद्यालयाकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर ही घटना घडली.
नेमकं काय घडलं !
पीडित २२ वर्षीय विद्यार्थिनी ही बाहेर जिल्ह्यात राहते. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातच राहते. मागील आठवड्यात कॉलेजला सुट्या असल्याने ती तिच्या गावाला गेली होती. ४ ऑक्टोबर रोजी गावावरून सामान व बॅग घेऊन परत येत होती. पिडीता बस थांब्यावर उतरली आणि महाविद्यालयात जाण्यासाठी उशीर झाल्यामुळे तिने जंगलातून जाणारी पायवाटने पायी जायचा निर्णय घेतला. थोड्याचा वेळा एका ३० ते ३५ वर्षीय युवकाने तिचा पाठलाग सुरु केला. भेदरलेल्या विद्यार्थिनीने तिच्या मोठ्या बहिणीला फोनवरून याची माहिती दिली. तिने तातडीने वडिलांना आणि त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला कळविले.
कुऱ्हाडीने ठार मारण्याचा धाक दाखवत अत्याचार !
महाविद्यालयामधील काही कर्मचारी त्या वाटेने तिच्या शोधात निघाले. मात्र ते पिडीतेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्या व्यक्तीने कुऱ्हाडीने ठार मारण्याचा धाक दाखवत शिवीगाळ करत अक्षरशः फरफटत नेले व कुऱ्हाडीच्या धाकावर तिच्यावर अत्याचार केला. पिडीत विद्यार्थिनीनेही पूर्ण ताकदीनिशी नराधमाला ढकलून स्वतःची सुटका केली. त्याचवेळी मदतीला आलेल्या कर्मचाऱ्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आरोपीने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी वर्धा मार्गावर असलेल्या येथील एका खासगी रुग्णालयात पाठविले.
बहिणीला फोनवर सांगितले, ‘कुणीतरी पाठलाग करतोय’ !
पीडित विद्यार्थिनी पायवाटेने एकटी जात असल्याचे आरोपीने बघितले आणि त्याने तिचा पाठलाग सुरू केला. घनदाट रस्ता सुरु झाल्यावर पीडितेला भीती वाटायला लागली. त्यामुळे तिने बहिणीला मोबाइलवरून फोन केला आणि तिच्याशी मोठ्याने बोलत निघाली. त्यातच कुणीतरी पाठलाग करीत आहे, हेसुद्धा तिने सांगितले. मात्र फोनवर बोलणे सुरूच ठेव, असे बहिणीने तिला सांगितले. आरोपीने तिला अखेर अडविलेच. तेव्हासुद्धा कॉल सुरूच होता. आरोपीने अडविताच तिने ओरडून मदत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे काहीतरी भयंकर घडत आहे, हे फोनवरून तिच्या बहिणीला कळले. तिनेसुद्धा क्षणाचाही विलंब न करता वडील व कॉलेजमध्ये कॉल करून माहिती दिली. त्यानंतर कॉलेजचे कर्मचारी शोध घ्यायला निघाले आणि घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाची पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी हा मजूर वर्गीय असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.