अमळनेर (प्रतिनिधी) ना. अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच शहरात आगमन होत असल्याने चक्क त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेचे विद्यार्थांना दीड-दोन तास रस्त्यांच्या दुतर्फा बसवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे मंत्री महोदयांना यावेळी कडक सलामी देखील द्यायला लावण्यात आली.
अजित पवार यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले अनिल पाटील शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. अमळनेरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी बॅण्ड लावून समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी आश्रमशाळेच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांना बोलावून घेत रस्त्याच्या दुतर्फा बसविण्यात आले होते. एवढेच नव्हे तर विद्यार्थांना मंत्री महोदयांना यावेळी कडक सलामी देखील द्यायला लावण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत शाळेतील २० ते २५ शिक्षक देखील उपस्थित होते.
दरम्यान, मंत्री अथवा व्हीआयपी व्यक्तींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असा नियम शासनाचाच नियम असल्यामुळे आरटीई कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. सकाळी ११ वाजेची वेळ असल्याने मुलांची जेवणाची वेळ असावी, मुले ताटकळले होते. विशेष म्हणजे ही संस्था माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांची आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना नेमके कशासाठी बोलावले हेसुद्धा सुरुवातीला माहिती नव्हते.