अमरावती (वृत्तसंस्था) एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार, २ ऑक्टोबर रोजी खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पीडित २७ वर्षीय विवाहित महिला रविवारी रात्री आपल्या कुटुंबासह घरी झोपली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना आवाज देऊन बाहेर बोलाविले. महिला घराबाहेर आल्याबरोबर चार आरोपींनी पिडीतेचे बळजबरीने अपहरण करून एका निर्जनस्थळी नेले. त्या ठिकाणी चौघांनी महिलेवर रात्रभर सामूहिक अत्याचार केला. सोमवारी सकाळी आरोपी तेथून निघून गेले. आरोपींच्या तावडीतून सुटल्यावर पिडीत महिलेने खोलापुरी गेट ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध अनधिकृत प्रवेश, अपहरण, धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यावर काही तासांतच या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
















