नागपूर (वृत्तसंस्था) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) येथील निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या ‘मार्ड’ वसतिगृहात अंघोळ करीत असलेल्या एका डॉक्टर तरुणीचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका निवासी डॉक्टरला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ वसतिगृहात महिला आणि पुरुष दोघांचीही एकत्रच निवासाची सोय आहे. गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास द्वितीय वर्षाला असलेली एक तरुणी निवासी डॉक्टर अंघोळीला गेली होती. वसतिगृहातील प्रसाधनगृहातील दरवाजे खालून तुटले असल्याचा गैरफायदा घेत एका निवासी डॉक्टरने तुटलेल्या दरवाज्यातून मोबाइलने व्हिडीओ शूटिंग करीत असल्याचे तरुणी डॉक्टरच्या लक्षात आले. यामुळे तिने आरडाओरड केली. यानंतर व्हिडीओ काढणारा निवासी डॉक्टर पळून गेला.
शुक्रवारी दुपारनंतर पिडीत तरुणी डॉक्टरने याबाबत अधिष्ठाता कार्यालयात तक्रार केली. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी तातडीने वसतिगृहाचे वॉर्डन डॉ. गौर व निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींसह बैठक घेतली. यानंतर संशयित निवासी डॉक्टरच्या मोबाइलची झडती घेतली असता त्याच्या मोबाइलमध्ये कोणताही व्हिडीओ किंवा फोटो आढळून आले नाहीत. परंतू या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी डॉ. गजभिये यांनी सहा सदस्यीय चौकशी समिती नेमली. दरम्यान, शुक्रवारी रात्री निवासी महिला डॉक्टरने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या संशयित निवासी डॉक्टरला ताब्यात घेतले होते.