बोदवड (प्रतिनिधी) शासनाने महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मोफत प्रवास लागू केला आहे. मात्र. आज बोदवड येथील शारदा कॉलनी बस थांब्यावर भुसावळ आगाराच्या दुपारी १२.४० वाजताची ९५३६ व २.२० ची ०५१९ या बसेस शारदा कॉलनी थांब्यावर थांबल्या नसल्याचा आरोप महिला प्रवाशांनी केला आहे.
बोदवड येथील शारदा कॉलनी बस थांब्यावर समोरून येत दोघं बसेसला आठ ते दहा महिलांनी व काही पुरुष प्रवाश्यांनी हात दिला. मात्र, संबधित चालक-वाहक यांनी बसमध्ये जागा रिकामी असतांना बस थांबवल्या नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव या प्रवाश्यांना खाजगी वाहतुकीच्या गाड्यांनी पैसे खर्च करून जावे लागले. याबाबत बोदवड बस स्थानकावर तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील तक्रार पुस्तकाचा लवकर शोध लागला नाही. एकदाच तक्रार पुस्तक सापडले. मात्र त्यात २०२० पासून फक्त एक तक्रार नोंदवली दिसली. या तक्रार पुस्तकाची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याबाबत कोणतेही शेरे दिसले नाहीत. त्यामुळे आपण केलेल्या तक्रारीचा काही उपयोग होईल की नाही?, याची शंका आल्याने संबधित व्यक्तीने तिथे तक्रात नोंदवली नाही. आधीच बोदवड वरणगावमार्गे भुसावळ बसच्या फेऱ्या कमी आहेत. त्यात असे प्रवासी न घेता बस निघून जात असल्याने प्रवाश्यांना खाजगी प्रवासी वाहतुकीने प्रवास करावा लागतो.