नागपूर (प्रतिनिधी) कोरोना काळात शासकीय निधीतून उभारण्यात आलेले अनेक ऑक्सिजन प्लांट सध्या वापराअभावी निष्क्रिय अवस्थेत पडून असल्याबाबत माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले. हे प्लांट भाडेतत्त्वावर देऊन कार्यान्वित करावेत, जेणेकरून शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल तसेच रोजगारनिर्मितीही होईल, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात राज्यभरातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, सिव्हिल हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये तातडीने आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. त्या काळात प्राणवायूच्या तीव्र टंचाईमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवी घटकांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला.
मात्र, कोरोना महामारी ओसरल्यानंतर सध्या राज्यात या प्लांटचा प्रत्यक्ष वापर होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी हे प्लांट बंद पडून धूळ खात गंजत आहेत. ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपव्यय होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
निष्क्रिय अवस्थेत असलेले ऑक्सिजन प्लांट औद्योगिक क्षेत्रासाठी वापरात आणणे गरजेचे आहे. उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची सातत्याने गरज असते. त्यामुळे हे प्लांट खाजगी औद्योगिक कंपन्यांना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिल्यास रोजगारनिर्मिती होईल, शासनाला भाड्याच्या स्वरूपात महसूल मिळेल आणि प्लांटमधील यंत्रसामग्री कार्यरत राहून सुस्थितीत राहील, अशी भूमिका आ. खडसे यांनी मांडली. यासाठी शासनाने तातडीने सर्वेक्षण करून औद्योगिक वापरासाठी भाडेतत्त्वावर हस्तांतरणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात शासकीय निधी वाया जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्लांट अद्याप अपूर्ण अवस्थेत असतानाही त्याच्या उभारणीसाठी कंत्राटदाराला संपूर्ण देयके अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही आ. खडसे यांनी केली.
या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अबिटकर यांनी सांगितले की, कोरोना काळात राज्यभरात एकूण ५०० प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (PSA) ऑक्सिजन प्लांट आणि ३९४ लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत. कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून (मार्च २०२०) आणि दुसऱ्या लाटेपर्यंत (जून २०२१) गंभीर रुग्णांना मेडिकल गॅस पाइपलाईन, ऑक्सिजन कन्सेंट्रेटर तसेच सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.
कोविडनंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ऑक्सिजनची मागणी तुलनेने घटली आहे. तसेच PSA प्लांट चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागते व विजेचे बिल अधिक येते. त्यामुळे सध्या लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट आणि सिलेंडरद्वारे आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता करण्यात येत असल्याचे मंत्री अबिटकर यांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार दर तीन महिन्यांनी PSA प्लांटचे मॉक ड्रिल घेऊन ते कार्यरत असल्याची खात्री करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
PSA ऑक्सिजन प्लांट सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालवण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन आहे. यामुळे प्लांट कार्यरत राहतील, आरोग्य संस्थांना आवश्यक ऑक्सिजन उपलब्ध होईल आणि खाजगी संस्थांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या ऑक्सिजनवरील खर्चात शासनाची बचत होईल. तसेच आणीबाणीच्या परिस्थितीसाठी हे प्लांट सज्ज राहतील, असे मंत्री अबिटकर यांनी सांगितले.
सध्या शासन स्तरावर २९५ मोठे PSA ऑक्सिजन प्लांट PPP तत्त्वावर देण्याबाबत विचाराधीन असून १७० छोटे प्लांट जिल्हा वार्षिक योजनेतील (डीपीडीसी) निधीतून देखभाल व दुरुस्ती करून कार्यान्वित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. कोविड काळात उभारण्यात आलेला कोणताही ऑक्सिजन प्लांट विनावापर राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथील अपूर्ण ऑक्सिजन प्लांटबाबत चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले.
















