सांगली (वृत्तसंस्था) प्रशासनाचा विरोध झुगारत सांगलीतील झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजिक केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणावर पोलिसांनी चरे मारले होते. शिवाय त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. झरे-वाक्षेवाडीच्या हद्दीत असलेल्या एका डोंगरावर ७ बैलगाड्यांची शर्यती पार पडली.
कायद्याने बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा पोलिस प्रशासनाने घेतला होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले. झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली.
बैलगाडी शर्यत सुरु व्हावी ही लोकांची मागणी : सदाभाऊ खोत
“इतके निर्बंध लावून देखील शर्यतीचे मैदान पार पडले. मोठा जनसमुदाय आणि बैलप्रेमी या शर्यतीसाठी उपस्थित राहिला, यावरून शर्यत सुरु व्हावी ही किती आग्रही मागणी आहे हे लक्षात येतं. आता नियम मोडले म्हणून जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी ते गुन्हे आनंदाने स्वीकारू.”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.