इस्लामाबाद (वृत्तसंस्था) गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणारी दुश्मनी आता मैत्रीच्या रूपात बदलताना दिसत असून भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या व्यापाराबाबत पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे. पाकिस्तान आता भारताकडून सूत आणि कापूस आयात करणार आहे.
साखरेबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. जवळपास दोन वर्षानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा व्यापार सुरू होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक आणि दुसर्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. साखर आयातीमुळे पाकिस्तानला रमजानच्या आधी साखरेचे दर कमी करण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉर्डिनेशन कमिटीने बुधवारी आपला एक अहवाल सादर केला. या अहवालात भारतासोबत कापूस आणि साखरेचा व्यापार पुन्हा सुरू करण्याची सुचना करण्यात आली होती. या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर पाकिस्तान आता अधिकृतपणे व्यापार सुरू करण्याच्या तयारीत आहे.
आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू असून भारतासोबतचे संबंध सुधरवण्यासाठीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
















